नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अ प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. दरम्यान, या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याबाबतही उल्लेख असल्याने आता भारतातही या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आहे.बराक ओबामा यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.दरम्यान, बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.बराक ओबामा हे २०१७ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश आहे.