नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपाने जोरदार तयारी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विटरवर मोदींची फिरकी घेतली आहे.
राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटखाली त्यांनी Modilie या शब्दाचे काही अर्थ ही दिले आहेत. सत्याची सातत्याने मोडतोड करणे, सवयीने थापा मारणे, न थकता खोटं बोलणे असा अर्थ मोदी लाय या शब्दाचा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या आधीही राहुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करताना 'Jaitlie' शब्द वापरला होता.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदी माझ्या वडिलांचा सातत्याने अपमान करतात, आजी आणि पणजोबांबद्दल वाईट बोलतात. परंतु तरीही मी त्यांच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. विधानसभा निवडणुकांचा हवाला देत राहुल गांधींनी सांगितलं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आम्ही त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणूकही तशाच प्रकारे प्रेमानं जिंकणार आहोत.
...तरीही मी मोदींच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही- राहुल गांधी
उज्जैनमधल्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार बाबुलाल मालवीय आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. भारतातील सर्वच लोक आमचे आहेत. मोदी नेहमीच द्वेषानं बोलतात. माझ्या वडिलांचा अपमान करतात. आजी आणि पणजोबांबद्दल वाईट वाईट बोलतात. तरीसुद्धा मी कधीही त्यांच्या कुटुंबीयांबद्दल वाईट बोलणार नाही. त्यांच्या आई-वडिलांबाबत अपशब्द काढणार नसल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. मी आरएसएस आणि भाजपाचा माणूस नाही. मी काँग्रेसचा माणूस आहे. मोदींनी माझा जेवढा द्वेष केला आहे, त्याला मी प्रेमानं उत्तर देणार आहे. मी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना प्रेम शिकवेन, याचा उल्लेखही राहुल गांधींनी आवर्जून केला होता.
मोदींच्या संताप व द्वेषाला प्रेमालिंगन हेच आमचे उत्तर - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. येत्या 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या शाजापूर मतदारसंघातील प्रचासभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींना संताप अनावर झाल्याने ते माझे वडील, आजी व आजोबांवर टीका करतात. ते मत्सर पसरवितात. मात्र मी त्यांना प्रेमालिंगन देऊन प्रेमाचा प्रसार करतो. ते म्हणाले की, मला पंतप्रधानांना सांगावेसे वाटते की, मत्सराने द्वेषावर मात करता येत नाही. मात्र प्रेमाने मत्सरावर नक्की विजय मिळविता येतो. त्यामुळे ते आमच्यावर जेवढ्या त्वेषाने टीका करतील त्याला आमच्याकडून तेवढ्याच उत्कट प्रेमाने प्रतिसाद मिळेल.