Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इटालियन वृत्तपत्र Corriere della Sera ला एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी भारतातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 'सध्या भारतात फॅसिझम आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालत नाही. लोकशाही संरचना कोलमडायला लागल्यावर आणि संसद नीट चालत नसल्यावर देशात फॅसिझम पसरतो', असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यावेळी केला.
राहुल गांधी यांची ही मुलाखत 1 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. फॅसिझमवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले होते की, 'विरोधकांनी फॅसिझमचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी दृष्टिकोन मांडला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होऊ शकतो. मी दोन वर्षांपासून बोलू शकलो नाही, मी बोलताच माझा मायक्रोफोन बंद केला जातो. देशात न्याय आणि माध्यमे मुक्त नाही,' अशी टीका त्यांनी केली होती.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले होते की, 'विरोधक एकत्र आले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे शक्य आहे. ते (पीएम मोदी) पराभूत होऊ शकतात, हे निश्चित आहे. हा विरोध उजव्या किंवा डाव्या बाजूचा नसून शांतता आणि संघटनाशी संबंधित असावा. जनतेला पर्यायी दृष्टिकोन देऊन फॅसिझमचा पराभव केला जातो,' असेही ते म्हणाले होते.