नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री एल. पी. साही यांचे शनिवारी दिल्लीतील एम्समध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारीच इस्पितळात दाखल केले होते. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले एल. पी. साही हे मूळचे बिहारचे असून, ते १९८0 साली विधानसभेवर निवडून आले होते. तसेच १९८४ साली ते लोकसभेवर आले. ते काँग्रेस कार्य समितीचेही बराच काळ सदस्य होते.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एल. पी. साही तसेच गोव्याचे माजी खासदार शांताराम नाईक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गोव्यात काँग्रेसचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी शांताराम नाईक यांनी सतत प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही ठरले होते, असे राहुल गांधी यांनी शोकसंदेशात म्हटलेआहे.शांताराम नाईक १९८४ साली लोकसभेवर निवडून आले होते. त्यानंतर दोनदा ते राज्यसभा सदस्य होते. एल. पी. साही यांची अनुपस्थिती आम्हा सर्व काँग्रेसजनांना कायम जाणवेल. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.
नाईक व साही यांना राहुल गांधी यांची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 4:04 AM