नवी दिल्ली: राहुल गांधी हे निपाह व्हायरससारखे आहेत. जो पक्ष त्यांच्या संपर्कात येईल, तो संपून जाईल, असं वादग्रस्त विधान हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी केलंय. विज हे आधीही त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिलेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष एकत्र आले होते. यावर भाष्य करताना अनिल विज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची तुलना थेट निपाह व्हायरसशी केली. 'ते (विरोधी पक्ष) एकत्र येण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र राहुल गांधी निपाह व्हायरससारखे असल्यानं, त्यांच्या संपर्कात येणारे पक्ष संपून जातील,' असं विज म्हणाले. केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसनं थैमान घातलंय. आतापर्यंत या व्हायरसमुळे 14 जणांना जीव गमवावा लागलाय. निपाह व्हायरसवर अद्याप कोणतीही लस सापडलेली नाही. त्यामुळेच हा व्हायरस जीवघेणा ठरतोय. हाच संदर्भ देऊन भाजपा नेते अनिल विज यांनी राहुल गांधींवर टीका केलीय. विज यांनी याआधीही अनेकदा राहुल गांधींवर शरसंधान साधलंय. डिसेंबरमध्ये राहुल गांधींनी सोनिया गांधींकडून पक्षाच्या नेतृत्त्वाची धुरा स्वीकारली. त्यावेळीही विज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत अभियानाला राहुल गांधी हातभार लावतील,' असा टोला त्यावेळी विज यांनी लगावला होता. गेल्या वर्षी विज यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे भाजपावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असल्यानं भारतीय चलनाचं मूल्य घसरत असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. खादीच्या प्रचार आणि प्रचारासाठी महात्मा गांधींपेक्षा मोदीच सरस आहेत, असंही वादग्रस्त विधान विज यांनी केलं होतं. भाजपानं विज यांच्या विधानांवरुन हात झटकले होते. विज यांची विधानं हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं होतं.
राहुल गांधी निपाह व्हायरससारखे; हरियाणाचे मंत्री बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 8:28 AM