नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष आधीच जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी स्पष्ट केले आहे. ‘टीव्ही- १८ तामिळ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदम्बरम म्हणाले की, काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांनाच नव्हे, तर इतर कोणालाही पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवून मतदारांकडे जाणार नाही.भाजपला सत्तेवरून हटविणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने पंतप्रधान कोणी व्हायचे हे नंतरही ठरविता येईल, असे सांगून चिदम्बरम म्हणाले की, भाजपच्या विरोधात देशभरातील समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरूआहेत. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत जाऊ नये यासाठी मोदी सरकार त्यांना धमकावत आहे, असा आरोपही त्यांनी केला.चिदम्बरम म्हणाले की, काँग्रेसने राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी कधीही पुढे केलेले नाही.मध्यंतरी काही नेत्यांनी तसे म्हटले होते. पण अ.भा. काँग्रेस समितीने हस्तक्षेप करून त्याचा ठामपणे इन्कार केला होता.>तयार आहोत, पण...मित्रपक्षांची इच्छा असेल तर आपण पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत, असे स्वत: राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले होते की, आधी एकत्रितपणे निवडणूक जिंकायची आणि नंतर पंतप्रधान कोण ते ठरवायचे, असा हा दोन टप्प्यांतील विषय आहे.
'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी उमेदवार नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:57 AM