नवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. राहुल गांधी यांनी देशामधील परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं भाजपा नेते जाफर इस्लाम बोलले आहेत. 'ज्या व्यक्तीला अम्मा आणि इंदिरामधील फरक कळत नसेल, ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करण्याइतकी सक्षम नाही', असा उपरोधिक टोला जाफर इस्लाम यांनी लगावला आहे.
आणखी वाचामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीकेरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणीयाशिवाय भाजपा नेते एस प्रकाश यांनाही राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी बेजबाबदार वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं एस प्रकाश बोलले आहेत. 'चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढू शकतो', असं एस प्रकाश यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करताना त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने भाषणं छोटी होत चालली असल्याची टीका केली होती. 'माझी आई 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर गेली होती. पंतप्रधानांनी आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण दिल्याचं तिने मला सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने त्यांच्या भाषणाची लांबी कमी होत चालली आहे', असं राहुल गांधी बोलले होते.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याचीही टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतक-यांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.