अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिरात 'अहिंदू' अशी नोंद झाल्यानंतर सुरू झालेल्या वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून ते जानवेधारी हिंदू आहेत असे वक्तव्य करत काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाला भाजपला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी यांची अहिंदू म्हणून रजिस्टरमध्ये नोंद होण्यामागे भाजपचा हात असल्याचा थेट आरोपच सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथील हिंदुंची मत वळवण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे. बुधवारीही ते अहमद पटेल यांच्यासमवेत सोमनाथ मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
(आणखी वाचा - गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका )
भारतीय जनता पक्षाने इतक्या खालच्या स्तरावर जायला नको होते, असे म्हणत सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, रजिस्टरमध्ये नोंद झालेले अक्षरही राहुल गांधींचे नाही, आणि ज्यावर राहुल गांधींनी सही केली ते रजिस्टरही मूळ रजिस्टर नाही. मंदिर प्रवेशावेळी रजिस्टर राहुल गांधींना देण्यात आलेले रजिस्टर वेगळेच होते.
(आणखी वाचा - राहुल गांधी हिंदू की ख्रिश्चन? सोशल मीडियावर धुमाकूळ )
या सगळ्या वादानंतर काँग्रेसने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी यांनी अभ्यागत वहीत स्वत:ची सही केलीच नव्हती. त्यामुळे इतरांकडून दावा करण्यात येत असलेली अभ्यागत वही खोटी आहे. राहुल गांधी यांची शंकरावर खूप श्रद्धा आहे. त्यांचा सत्यावरही तेवढाच विश्वास आहे. अडचणीच्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपने हे कुंभाड रचल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते दीपेंदर सिंह हुडा यांनी केला. यावेळी हुडा यांनी राहुल यांची स्वाक्षरी असलेली सोमनाथ मंदिरातील अभ्यागत वहीची प्रतही पत्रकारांना दाखवली. ज्या अभ्यागत वहीवरून हा वाद निर्माण झाला आहे त्यामध्ये राहुल यांची स्वाक्षरी ‘राहुल गांधी जी’ अशी असल्याचेही हुडा यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. राहुल गांधी स्वत:च्याच नावापुढे ‘जी’ का लावतील? भाजपनेच लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणल्याचेही हुडा यांनी सांगितले.
राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सोमनाथ मंदिरातल्या त्या नोंदीमुळे त्यात भर पडली आहे. दरम्यान, ट्विटरवर RagaSomnathSelfGoal हा हॅशटॅग अव्वलस्थानी असून एकच चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन?
पाहा काँग्रेसची पत्रकार परिषद -