Rahul Gandhi: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल गांधींना फटकारले, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:35 PM2022-02-03T12:35:10+5:302022-02-03T12:35:48+5:30
Rahul Gandhi News: 'परवानगी देणारे तुम्ही कोण? हा माझा अधिकार आहे, तुमचा नाही.'
नवी दिल्ली: काल(बुधवार) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस नेते राहुल गांधींवर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना ओम बिर्ला यांनी काल राहुल गांधी यांना एका गोष्टीबद्दल फटकारले. राहुल गांधींच्या वतीने संसदीय कार्यपद्धती योग्य न पाळल्याने ओम बिर्ला चर्चेदरम्यान संतापल्याचे पाहायला मिळाले.
तुम्ही परवानगी देणारे कोण?
संसदेत राहुल गांधी बोलत होते, तेवढ्यात भाजप खासदार कमलेश पासवान बोलण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी राहुल गांधींनी भाजप खासदार कमलेश पासवान यांना चर्चेदरम्यान बोलू दिले. राहुल गांधींच्या या कृत्यामुळे ओम बिर्ला संतापले आणि "बोलण्याची परवानगी देणारे तुम्ही कोण? तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, हा माझा अधिकार आहे. तुम्हाला कोणालाही परवानगी देण्याचा अधिकार नाही,'' असे म्हणाले.
राहुल गांधींची भाजप खासदाराला ऑफर
संसदेत राहुल गांधींचा भाजप खासदार कमलेश पासवान यांच्याशी वाद झाल्याचे पाहायला मिळाले. 'कमलेश पासवान चांगले दलित नेते आहेत, पण ते चुकीच्या पक्षात आहेत. तिथे तुमच्या बलिदानाची कोणालाच पर्वा नाही', असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर पासवान म्हणाले, 'मी दलित समाजातून आलो असून भाजपने मला तीनवेळा खासदार केले, राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. माझ्यासाठी यापेक्षा मोठे पद कोणते असू शकत नाही. तुमच्या पक्षाकडे मला खूश करण्याची क्षमता नाही', असे उत्तर पासवान यांनी दिले.