Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra :काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राहुल यांना 'भारत जोडो' यात्रेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "या दौऱ्यामुळे माझा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. भारतीय राजकारणात प्रेमाचा परिचय करुन देणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता. या दौऱ्यात मला अनेक धडे मिळाले, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम ही संकल्पना राजकारणात राबवता येते."
भारत जोडो यात्रा का करावी लागली?यावेळी राहुल गांधींनीभारत जोडो यात्रा सुरू करण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, "भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. मी संसदेत दिलेले भाषण टीव्हीवर दाखवले जात नव्हते, माध्यमांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मला कायदेशीर मदतही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आमच्या लक्षात आले की, माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचू शकत नसलो, तरी थेट लोकांपर्यंत जाणे हाच उत्तम मार्ग आहे. त्यामुळेच मी देशभरात 4000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला."
ही आध्यात्मिक यात्रा होती"सुरुवातीला गुडघ्याच्या समस्येमुळे मला अडचणींचा सामना करावा लागला. पहिले 3-4 दिवस वाटले की, आपण यात्रा काढून चूक केली. पण, हळुहळू मला याची सवय झाली. या दौऱ्याने माझा लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून गेला. या दौऱ्याचा सर्वात प्रभावशाली पैलू म्हणजे, भारतीय राजकारणात 'प्रेम' या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः 'प्रेम' सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले. ही फक्त भौतिक यात्रा नव्हती, तर एक आध्यात्मिक यात्राही होती, ज्यामुळे आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला," असेही राहुल यावेळी म्हणाले.