Rahul Gandhi on BJP RSS:काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी युवकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. 'भाजप सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयात स्वत:हून कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यासाठी त्या मंत्रालयांमध्ये आरएसएसचे लोक तैनात करण्यात आले आहेत, ते मंत्रालयाच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात,' अशी टीका राहुल यांनी केली.
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, 'भाजप देशातील सर्व महत्त्वाच्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर आरएसएसच्या लोकांना नियुक्त करत आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारतातील या स्वातंत्र्याचा पाया हा देशाचे संविधान आहे. संविधानाचे नियम कृतीत आणण्यासाठी अनेक संस्था निर्माण केल्या आहेत. लोकसभा, राज्यसभा, नीती आयोग, सैन्य, हे सर्व घटक यात येतात. भाजप या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर आरएसएसच्या लोकांना नियुक्त करत आहे,' असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की, 'जर तुम्ही भारत सरकारच्या मंत्र्यांकडे जाऊन विचाराल की, तुमच्या मंत्रालयाशी संबंधित निर्णय तुम्ही घेता का? तर मंत्री म्हणतात, इथे एक व्यक्ती आहे, जो आरएसएसच्या ओएसडीसारखा आहे. त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतरच आम्ही आमच्या मंत्रालयात निर्णय घेतो,' असंही राहुल म्हणाले.