नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या तपासावरुन काँग्रेस आणि भाजप आमन-सामने आले आहेत. काँग्रेसकडून भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कारवाईवरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ''आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात घाबरत नाही. काय करायचे ते करा, आम्हाला पर्वा नाही. दबाव आणून आम्हाला ते गप्प करू शकत नाही. लोकशाही वाचवणे हे आमचे काम आहे, असा हल्लाबोल राहुल यांनी केला. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बोलताना आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'इतिहास साक्षी आहे, 'हर घर तिरंगा' मोहीम चालवणारे 52 वर्षे तिरंगा न फडकावलेल्या देशद्रोही संघटनेतून बाहेर पडले आहेत. स्वातंत्र्यलढ्यापासून ते काँग्रेस पक्षाला रोखू शकले नाहीत आणि आजही रोखू शकणार नाहीत.'
काँग्रेसमध्ये संतापनॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची जवळपास 12 तास चौकशी केली. ईडीने राहुल गांधी यांचीही दीर्घकाळ चौकशी केली. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने आपला तपास पुढे करत बुधवारी दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियनचे कार्यालय सील केले आहे. या कारवाईमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.