Rahul Gandhi Raised Question on EVM : काही दिवसांपूर्वी, म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर आता इतक्या दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी (16 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे. त्यांच्यावर EVM मध्ये छेडछाड करुन विजयी झाल्याचा आरोप आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “EVM हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. त्यांची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते," अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांचीही जोरदार टीकाशिवसेना नेते आदित्य यांनीदेखील यावरुन जोरदार टीका केली. "एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला आहे. निवडणूक आयोग सीसीटीव्ह फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचे दिसून येते. चंडीगड प्रकरणात झालेल्या प्रकारात त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून ही दृश्ये दिली जात नाहीत. भाजपा आणि मिंधे गटाला लोकशाही संपवायची आहे आणि संविधानही बदलायचे आहे", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
काय प्रकरण आहे?राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनी मिड डे न्यूजचे वृत्त शेअर केले आहे. या वृत्तात सांगण्यात आले आहे की, रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. त्यांच्या छेडछाडीमुळेच वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या वेळी मंगेश जो फोन वापरत होता, तो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (ईव्हीएम) जोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांना मंगेश मांडिलकर यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडले आहेत. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोन वापरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.