Rahul Gandhi on GST:'हाय टॅक्स, नो जॉब्स', GST दर वाढीवरुन राहुल गांधींचा नरेंद्र मोदी सरकारवर निशाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:10 PM2022-07-18T17:10:55+5:302022-07-18T17:11:04+5:30
Rahul Gandhi on GST: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने अनेक वस्तुंवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Rahul Gandhi on GST: आजपासून देशभरात वस्तू आणि सेवा कराचे (GST) दर बदलण्यात आले आहेत. नवीन दर लागू झाल्याने सर्व जीवनावश्यक वस्तू जसे की दही, लस्सी, तांदूळ, पनीर आणि इतर पदार्थ आज 18 जुलैपासून महागले आहेत. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी जीएसटीला 'गब्बर सिंग टॅक्स' म्हटले.
केंद्र सरकार फक्त कर वाढवण्याचे काम करत आहे, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. यासोबतच त्यांनी बेरोजगारीवरुनही सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी ट्विट केले, "कर जास्त, नोकऱ्या नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त करायची यावर भाजपचा मास्टरक्लास सुरू आहे." यासोबतच राहुल गांधी यांनी जीएसटी दरातील बदलामुळे महाग झालेल्या वस्तूंची यादीही शेअर केली आहे. त्यांची यादीसह 'गब्बर सिंग स्ट्राइक अगेन!' असे कॅप्शनही दिले.
HIGH taxes, NO jobs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 18, 2022
BJP’s masterclass on how to destroy what was once one of the world’s fastest growing economies. pic.twitter.com/cinP1o65lB
जीएसटी दरात बदल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने डब्बा बंद मासे, दही, पनीर, लस्सी, मध, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि यांसारख्या पॅके केलेल्या(फ्रोझन वगळता) आणि तृणधान्ये आणि मुरमुऱ्यावर 5% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उघड्यावर विकल्या जाणार्या अनब्रँडेड उत्पादनांवरील जीएसटी सूट कायम राहणार आहे.
याशिवाय, दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेल रूमवर 12 टक्के कर आकारला जाईल. पूर्वी ते सूटच्या श्रेणीत येत होते. याव्यतिरिक्त, रूग्णालयाच्या खोलीच्या भाड्यावर 5 टक्के दराने जीएसटी आकारला जाईल. तसेच, सोलर वॉटर हिटरवर पूर्वीच्या 5 टक्क्यांच्या तुलनेत आता 12 टक्के जीएसटी लागेल. एलईडी दिव्यांवर 18 टक्के कर लागेल.