नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, अग्निवीर योजना ही लष्कराची योजना नाही, असे भारत जोडो यात्रेदरम्यान लष्करी अधिकारी आणि माजी सैनिकांनी त्यांना सांगितले होते. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये अदानींना फायदे दिले जातात, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले, माझ्या भारत जोडो यात्रेदरम्यान तमिळनाडू, केरळपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात अदानींचेच नाव ऐकू येत होते. तरुण विचारायचे की, आम्हालाही अदानींसारखा स्टार्टअप सुरू करायचे आहे. ते ज्या व्यवसायात हात घालतात, त्यात यशस्वी होतात. यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांमध्ये 609 व्या क्रमांकावर होते. अशी काय जादू घडली की नऊ वर्षांत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. यावेळी काँग्रेस खासदारांनी मोदी है तो मुमकिन है अशा घोषणा दिल्या.
राहुल गांधी पुढे म्हणाले, पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अदानींना कर्ज देते. मोदीजी जगभर फिरतात तेव्हा काय केलं जातं. ते बांगलादेशात जातात, तिथे बांगलादेशला वीज विकण्याचा निर्णय होतो आणि काही दिवसांनी बांगलादेश अदानींसोबत 25 वर्षांचा करार करतो. यानंतर श्रीलंकेवर दबाव आणून पीएम मोदी एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून देतात. हे अदानींसाठीचे परराष्ट्र धोरण आहे.
एलआयसीबाबत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान आणि भारत सरकार अदानींना कशी मदत करतात. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका अदानीजींना हजारो कोटी रुपये देतात. SBI, PNB सारख्या बँकांचा यात समावेश आहे. या बँकांचे पैसे, एलआयसीचे पैसे अदानीकडे जात आहेत. त्यांच्या विरोधात कोणी उभे राहताच ईडी, सीबीआयच्या तपास यंत्रणा मदतीला धावून येतात. काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गचा अहवाल आला होता. अदानींच्या शेल कंपन्या देशाबाहेर आहेत असे सांगण्यात आले होते. या शेल कंपन्या हजारो कोटी रुपये पाठवत आहेत, हा पैसा कोणाचा आहे, असा सवालही त्यांनी केला.