नवी दिल्ली: सध्या देशात अदानी प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यावरुन विरोधक भाजप सरकारवर टीका करत आहेत. यावरुनच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत तुफान फटकेबाजी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सरू असताना राहुल यांनी गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो दाखवत त्यांच्या संबंधांवर प्रश्न विचारला. तसेच, अदानींसाठी सरकारने नियमांमध्ये बदल केले आणि त्यांना मदत केल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यावेळी म्हणाले, 'मी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक राज्यात फिरलो. सगळीकडे गेल्यावर मला फक्त एकचं नाव ऐकू यायचे, ते म्हणजे, गौतम अदानी यांचे. लोकं विचारायचे की, राहुल जी...अदानी कसकाय अनेक क्षेत्रांमध्ये अचानक पुढे जात आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे फक्त एक-दोन बिझनेस होते, पण आता त्यांचे आठ-दहा बिझनेस आहेत.'
'2014 पूर्वी गौतम अदानी यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत 609 वा क्रमांक होता. पण, 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर गौतम अदानी काही वर्षातच दुसऱ्या स्थानावर पोहोचले. त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय संबंध आहेत? मी सांगतो...काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा काही घटनांमुळे अनेकांनी मोदींचा विरोध केला होता. पण, त्यावेळेस फक्त अदानी मोदींच्या बाजूने उभे राहिले होते.'
'2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि खरी जादू सुरू झाली. काही वर्षातच अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी सरकारने विमानतळाच्या विकासाची योजना आखली. तेव्हा एक नियम होता की, ज्यांना अनुभव नाही, त्यांना विमानतळ देता येत नव्हते. पण, हा नियम भाजप सरकारने बदलला आणि विमानतळांचे खासगीकरण करुन अदानींच्या हातात सहा विमानतळ दिले. यानंतर अदानींनी देशातील सर्वाधिक एअर ट्रॅफिक स्वतःच्या विमानतळांवर वळवले,' अशी माहिती राहुल यांनी संसदेत दिली.
नरेंद्र मोदी बांग्लादेशला गेले आणि तिथला मोठा पॉवर प्रोजेक्ट गौतम अदानींना मिळाला. यानंतर मोदी श्रीलंकेला गेले आणि तेथील सरकारवर दबाव टाकून एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून दिला. सरकारी कंपनी असलेल्या LIC चा पैसाही अदानींच्या कंपनीत लावून मोठी मदत केली गेली. अदानी देशाच्या अर्थ क्षेत्रात हस्तक्षेप करतात, डिफेन्स क्षेत्रात हस्तक्षेप करतात. शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे भारतात आणले जात आहेत. या कंपन्या कोणाच्या आहेत, हे तपासण्याचे काम सरकारचे आहे.