NEET Paper Leak : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी(दि.22) सुरुवात झाली. आज अर्थमंत्र्यांनी देशाचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले, तर उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पुर्वी, लोकसभेत NEET पेपर लीकचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुकसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले.
शिक्षणमंत्र्यांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, 'देशातील लाखो विद्यार्थी परीक्षा प्रणालीबाबत चिंतित आहेत आणि त्यांना ही प्रणाली फसवी वाटते. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की, जर तुमच्याकडे पैसा असेल, तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धती किंवा पेपर खरेदी करू शकता. विरोधकांचीही तीच भावना आहे. आपल्या परीक्षा पद्धतीत गंभीर समस्या आहे, हे संपूर्ण देशाला समजले आहे.
हा मुद्दा फक्त NEET परीक्षेपुरताच मर्यादीत नाही, तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये गडबड आहे. अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे शिक्ष मंत्र्यांना द्यावी लागतील. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतःला सोडून सगळ्यांना दोष दिला. मला वाटत नाही की, त्यांना इथे काय चालले आहे, याची थोडीही माहिती आहे,' अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.
शिक्षण मंत्र्यांचा पलटवारराहुल गांधी यांच्या या टीकेवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नकोय. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली खराब आहे, असे म्हणणे दुर्दैवी आहे. कपिल सिब्बल यांनीच 2010 साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या 7 वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे (NEET) प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की, NTA ने 240 हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत,' असा पलटवार प्रधान यांनी केला.