BJP On Rahul Gandhi: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. त्यांनी आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी हे जन्मतः ओबीसी नव्हते. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांची जात ओबीसी म्हणून अधिसूचित केली.
त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजपचे अमित मालविय यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, राहुल गांधींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधान मोदींची जात गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याच्या दोन वर्षे आधी, 27 ऑक्टोबर 1999 रोजी ओबीसी म्हणून अधिसूचित करण्यात आली होती.
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले होते, पंतप्रधान मोदी संसदेत म्हणतात की, मी ओबीसी आहे. मोदीजींचा जन्म गुजरातमधील तेली जातीच्या कुटुंबात झाला. त्यांच्या समाजाला भाजपने सन 2000 ओबीसीत आणले. पंतप्रधान मोदींचा जन्म जनरल(ओपन) कॅटेगरीत झाला होता. मोदी ओबीसी समाजातील व्यक्तीला मिठी मारत नाहीत, कोणत्याही शेतकऱ्याचा हात हातात धरत नाहीत.
पंतप्रधान मोदी जात जनगणना करायला तयार नाहीत. जात जनगणना फक्त काँग्रेसच करू शकते. मागासलेल्या लोकांच्या हक्क आणि वाट्याला ते कधीच न्याय देऊ शकत नाहीत. पीएम मोदींचा पगार 1 लाख 60 हजार रुपये आहे. ते दिवसभरात लाखो रुपयांचे सूट बदलतात. ते कधी 2-3 लाख रुपयांचा सूट घालतात तर कधी 4-5 लाख रुपयांचा. 1 लाख 60 हजार रुपये पगार असलेले पंतप्रधान मोदी महिन्याला 2-3 कोटी रुपयांचे सूट कसे घालू शकतात? असा सवालही त्यांनी यावेळी केली.