Rahul Gandhi On PM Modi ( Marathi News ): काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केलेल्या टीकेवर दिल्लीउच्च न्यायालयाने (Delhi High Court) आक्षेप नोंदवलाय. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'पिकपॉकेट'(खिसेकापू) म्हणाले होते. त्यांची ही टीका योग्य नसल्याचे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे.
इतकंच नाही तर राहुल गांधी यांच्याविरोधातील या प्रकरणात योग्य निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. यासोबतच अशा विधानांबाबतचे नियम अधिक कडक करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.
काय म्हणाले होते राहुल गांधी?काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 21 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम मोदींना खिसेकापू, पनौती मोदी, अशी टीका केली होती. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लिम करतात, तर कधी क्रिकेटच्या सामन्यांना जातात. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, हे मोदींचे काम आहे, अशी टीका त्यांनी केली होती.