नवी दिल्ली : काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर ट्विटरवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून सरकारवर निशाणा साधला आहे. महागाई दर आणि घटत्या मुदत ठेवी किंवा एफडी व्याजदराच्या मुद्द्यांवरून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक'मुळे तुमचा कष्टाचा पैसा नष्ट झाला आहे.
राहुल गांधी म्हणाले, "महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर आला आहे, तर एफडीचा व्याजदर 5 टक्क्यांवर आला आहे. तुमच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणे विसरून जा, पीएम मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक'ने तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा नष्ट केला आहे." तसेच, राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये 2 लाख रुपये फिक्स केल्यास 11,437 रुपये मिळतात, तर 2012 मध्ये यापेक्षा जास्त 19,152 रुपये मिळत होते. दरम्यान, राहुल गांधींनी याला जन धन लूट योजना म्हटले आहे.
याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवल्याप्रकरणी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करून जहांगीरपूरमध्ये हा बुलडोझर चालवला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा बुलडोझर देशाच्या संविधानावर चालवला जात आहे. देशातील गरीब अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे हा यामागील उद्देश आहे. भाजपने आपल्या मनात दडलेल्या द्वेषावरही बुलडोझर फिरवला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले होते.