- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘मोहब्बत की दुकान’ आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे लवकरच दिल्लीत येत असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतील. त्यानंतर लगेच राहुल गांधी ठाकरे कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबईत जाणार आहेत.
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुंबईत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पुढील बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत - काँग्रेसची सावरकरांच्या मुद्द्यावरील भूमिका शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे व ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बातम्या येताहेत, ते पाहता मला एकट्यालाच भाजपशी लढावे लागेल, असे दिसते.
के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. परंतु उद्धव ठाकरे दिल्लीत येण्याचे संकेत मिळाले नाहीत. यापूर्वीही जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मविआ सरकारचे गठन होणार होते, त्याआधी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत येऊन तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्याबरोबर बैठक झाली होती.
इंदिरा गांधी यांनी घेतली होती भेटठाकरे कुटुंबीयांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी जाणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे दुसरे सदस्य आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात जवळीक वाढत आहे. यावरून काँग्रेससाठी शिवसेना राष्ट्रवादीपेक्षा महत्त्वाची झाली आहे की काय, असे राजकीय परिस्थिती पाहून वाटते.