गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचीभारत जोडो यात्रा सुरू आहे. यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. यादरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच अनेक माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे
राहुल गांधी यांनी अगोदर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधी 'वीर भूमी' येथे आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे 'शक्तीस्थळ', नेहरूंचे 'शांती वन', लाल बहादूरांचे 'विजय घाट', महात्मा गांधींचे 'राजघाट' आणि वाजपेयींचे 'सदैव अटल' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींच्या समाधीवर गांधी घराण्यातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा उच्चपदस्थ नेता पहिल्यांदाच पोहोचला ही मोठी गोष्ट आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती.
आधी राहुल गांधी शनिवारी संध्याकाळीच या नेत्यांच्या समाधीचे दर्शन घेणार होते, मात्र शनिवारी सायंकाळी पदयात्रा पूर्ण होण्यास वेळ लागल्याने कार्यक्रम बदलण्यात आला. 'भारत जोडो यात्रेत सुमारे तीन हजार किलोमीटरचे अंतर पार करून दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रमुख नेत्यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली.
राहुल गांधी आणि इतर अनेक 'भारत यात्री' शनिवारी पदयात्रा काढत दिल्लीत दाखल झाले होते. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या नऊ राज्यांमधून गेली आहे. सुमारे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि शेवटी जम्मू-काश्मीरकडे जाणार आहे.