चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:ताला राजे समजत आहेत. देशात अराजक माजले असून मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत देशाला 15 वर्षे मागे लोटल्याचा आरोप डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी केला.
डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.
यावेळी सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. देशात अराजक माजले असून मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत देशाला 15 वर्षे मागे लोटले आहे. जर यांना पुन्हा पंतप्रधानपदावर बसविल्यास देश आणखी 50 वर्षे मागे जाईल अशी आपल्याया खात्री असल्याचे, स्टॅलिन म्हणाले. मोदी स्व:ताला राजे समजत आहेत. यामुळे आम्ही सर्व एकत्र येवून देशाची लोकशाही आणि देशाला वाचवणार आहोत.
देशाला नव्या तरुण पंतप्रधानाची गरज आहे. यामुळे तामिळनाडूतर्फे आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आपण मांडत असल्याचे स्टॅलिन म्हणाले. तसेच राहुल यांच्यामध्ये मोदी सरकारला हरवण्याची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.