राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:30 AM2024-08-16T05:30:00+5:302024-08-16T05:30:02+5:30
केंद्राने आराेप फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन सोहळ्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनाचा कोतेपणा, तसेच विरोधकांप्रति असलेला अनादर अधोरेखित होत असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. केंद्र सरकारने मात्र काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त मान्यवरांसाठी केलेल्या आसन व्यवस्थेत राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्यात आले.
ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बाजूला राहुल यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली होती. या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी समाजमाध्यम मंचावर यासंदर्भात टीका करताना या कृतीतून पंतप्रधानांच्या मनाचा कोतेपणा तर दिसतोच शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून त्यांनी काहीही बोध घेतला नसल्याचेही स्पष्ट होत असल्याचे म्हटले.
- काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. विरोधकांप्रति पंतप्रधानांना आदर नसल्याचे यातून स्पष्ट होते.
- विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद असून, त्यांना पंतप्रधानांइतकाच मान असतो. मात्र, हे संकेत केंद्र सरकारने पायदळी तुडविल्याचे श्रीनेत म्हणाल्या.
- ऑलिम्पिक हिरोंना सन्मानित करण्याचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यानुसारच आसन व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.