केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 08:37 PM2023-03-03T20:37:09+5:302023-03-03T20:37:27+5:30
'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.'
Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना चीनचे कौतुक केले. चीन हा शांततेचा देश आहे. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चीनच्या रणनीतीचाही उल्लेख केला. तसेच, चीनने केलेल्या विकासाबद्दल आणि पाश्चिमात्य देशांच्या विचारसरणीवरही भाष्य केले.
राहुल चीनबद्दल काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, चीनमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची पायाभूत सुविधा(रेल्वे, विमानतळ) दिसते, ती सर्व निसर्गाशी, नदीच्या शक्तीशी जोडलेली आहे. चीनचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. अमेरिकेचा विचार केला तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. चीनला शांततेत किती रस आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. सध्या भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे, असेही राहुल म्हणाले.
जम्मू-काश्मीरबाबत राहुल यांचे वक्तव्य
राहुल यांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला 'तथाकथित हिंसक ठिकाण' म्हटले. काश्मीर हे बंडखोरी प्रवण राज्य आहे आणि तथाकथित हिंसक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आमचे 40 जवान शहीद झाले, त्या ठिकाणीही मी गेलो होतो. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठात राहुल यांनी दिलेली इतर अनेक विधानेही चर्चेचा विषय बनली आहेत. पेगाससबाबतही त्यांनी आपते मत मांडले आहे.
केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख
भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे राहुल म्हणाले. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. मला अधिकाऱ्यांनी फोनवर काळजीपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला होता. कारण फोन रेकॉर्ड केले जात होते. भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. अशा प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले, जे अजिबात मी केले नाहीत, असेही राहुल म्हणाले.