राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:18 PM2021-12-07T13:18:34+5:302021-12-07T13:18:42+5:30
'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी
नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभेत काँग्रेस आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने मांडत आहे. मंगळवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत शहीद शेतकऱ्यांची यादी सभागृहाकडे सुपूर्द केली. यावेळी राहुल गांधींनी तीन कृषी कायद्यांविरोधात अनेक महिने चाललेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली. याशिवाय राहुल गांधी यांनी ट्वटरवरुनही पंतप्रधनांवर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांचे ट्विट-
सत्याग्रही शहीद किसानों के नाम पर मुआवज़ा ना देना, नौकरी ना देना और अन्नदाताओं के ख़िलाफ़ पुलिस केस वापस ना लेना बहुत बड़ी ग़लतियाँ होंगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 7, 2021
आख़िर PM कितनी बार माफ़ी माँगेंगे?#FarmersProtest
काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, 'शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकरी शहीद झाले. पंतप्रधानांनी देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली. आपल्याकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी.' दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनात किती शेतकरी शहीद झाले ? अशी विचारणा कृषीमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सरकारकडे शेतकरी मृत्यूचा कोणताही डेटा नसल्याचे म्हटले होते.
पंजाबमध्ये सरकारने भरपाई दिली, केंद्रानेही द्यावी
राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'पंजाबमधील काँग्रेस सरकारने सुमारे 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. त्यापैकी 152 शेतकऱ्यांना रोजगारही देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे आहे, जी मी सभागृहाच्या पटलावर ठेवली आहे. तिकडे हरियाणामध्येही 70 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळाली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली आणि त्यांचे कृषी मंत्री म्हणतात मृतांचा रेकॉर्ड नाही. आता आम्ही यादी सभागृहात मांडली आहे, सरकारने लवकर भरपाई द्यावी', असेही राहुल म्हणाले.
काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला
यानंतर काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधींनी काही मिनीटात शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबत माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.