नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लकरच अध्यक्षपदाची सुत्रे संभाळतील अशी माहिती सोनिया गांधी यांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं याबबातचे वृत्त दिले आहे. 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत काँग्रेस पक्षानं नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली 19 वर्षे पक्षाच्या अध्यक्षपदी असलेली आपली आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार आहेत.
गेल्या काही महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक पक्षकार्यातून लक्ष काढून उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती दिल्याचे वृत्त होतं. यावेळी राहुल यांनी गुरूदास कामत व दिग्विजय सिंग यांना दूर करून, राजस्थानासाठी अविनाश पांडे व कर्नाटकात के. सी. वेणुगोपाल यांना नेमले. त्यानंतर पी. एल. पुनिया, आर. पी. एन. सिंह, आर. सी. खुंटिया, चेल्लाकुमार, गिरीश चोंडकर यांचीही विविध प्रभारी म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्रात काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षपदावरून चंद्रकांत दायमा यांना हटवून केशवराव औताडे यांना नेमले. दिग्विजय सिंग, कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाशना दूर करा, अशी मागणी केल्यावर राहुल गांधी यांनी तेथे दीपक बाबरिया यांना नेमले. माध्यामांच्या वृत्तानुसार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे आधीपासून स्विकारली आहेत, त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.
राहुल गांधी महिन्याभरात निवडून येणार काँग्रेसच्या अध्यक्षपदी - वीरप्पा मोईली
काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केलं होतं. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षाने दिली तर आपण ही जबाबदारी पेलू असे वक्तव्य गांधी यांनी केले होते. राहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केली. तसेच राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेल असेही मोईली म्हणाले. यामुळे काँग्रेसच नाही तर देशासाठीही हे शुभवर्तमान असेल ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे?
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पायलट म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, अशी पक्षात सर्वसाधारण भावना आधीपासूनच आहे. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते बरेच कामही करत आहेत, पण त्यांची पक्षाध्यक्षपदी बढती यथोचित वेळी व्हावी, असे पक्षाचे मत आहे. आता ती वेळ आली आहे, असे मला वाटते. पक्षात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्या झाल्या की, नवा अध्यक्ष दिवाळीनंतर लगेचच सूत्रे स्वीकारेल, असे वाटते.