Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेल्जियममधील पत्रकार परिषदेत भारतात आयोजित G20 शिखर परिषदेवर भाष्य केले. जी-20 परिषद खूप महत्त्वाची आहे आणि भारताने याचे आयोजन केले, ही खूप चांगली गोष्ट आहे. यावेळी राहुल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना G-20 डिनरसाठी आमंत्रित न केल्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डिनरचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावर राहुल गांधी म्हणाले की, सरकारने विरोधी पक्षनेत्याला बोलावले नाही, यावरुनच त्यांचे विरोधीपक्षाबद्दल असलेले मत दिसून येते. याचाच अर्थ सरकार भारतातील 60 टक्के लोकसंख्येच्या नेत्यांना किंमत देत नाहीत.
राहुल गांधींना विचारण्यात आले की, यावेळी बहुतांश युरोपियन नेते भारतात आहेत. ते पंतप्रधान आणि सरकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. तुम्हाला असे वाटते का की, हिंदू राष्ट्रवादाला फ्रीपास दिला जातोय? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, जी 20 ही महत्त्वाची आहे आणि भारत याचे आयोजन करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतात नक्कीच काही मुद्दे आहेत जे आम्ही उपस्थित केले आहेत, पण ते फ्रीपास देताहेत असे म्हणणे मला योग्य नाही.
यावेळी रशिया-युक्रेन युद्धावरील प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. ते म्हणाले की, आमचे रशियाशी संबंध आहेत. या मुद्द्यावर विरोधकांचे मत सरकारपेक्षा वेगळे आहे, असे मला वाटत नाही. रशिया-युक्रेन युद्धाव्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, चीनने उत्पादन क्षेत्रात मोठे काम केले आहे. भारताच्या बाजूने अशी कोणतीही योजना असल्याचे दिसत नाही.
काश्मीरमध्ये शांतता असावीजम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की, शांतता असायला हवी. केवळ अल्पसंख्याकांवरच नाही तर दलित आणि आदिवासींवरही हल्ले होत आहेत. काही संस्थांचा ज्या प्रकारे वापर केला जात आहे, तो अत्यंत गंभीर आहे.