नवी दिल्ली- शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज सदस्यत्व रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला. स्पीकरने बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप गांधी यांनी केला. मोदी आडनावाबाबत माफी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही'.
'मी फक्त एकच प्रश्न विचारला. अदानीजींचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे पण पैसा त्यांचा नाही. मला फक्त हे २०,००० कोटी रुपये कोणाचे आहेत हे जाणून घ्यायचे होते. मी मीडिया रिपोर्ट्समधून माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते नवीन नाही. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून हे नाते सुरू आहे. मी लोकसभेत विमानात बसलेल्या नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवला. ते माझे भाषण डिलीट करण्यात आले. मी या प्रकरणी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, "त्यानंतर भाजप सदस्यांनी माझ्याबद्दल खोटे बोलायला सुरुवात केली की मी परदेशी मदत मागितली आहे. हे सर्वात हास्यास्पद विधान आहे. मला बोलण्यासाठी संधी दिली पाहिजे अशी मागणी मी अध्यक्षांकडे केली आहे. पण तसे झाले नाही. मी दोनदा पत्रे लिहिली. यावेळी अध्यक्ष म्हणाले मी काही करू शकत नाही."
यावेळी पत्रकारांनी माफी मागण्यासंदर्भात प्रश्न विचारला यावर राहुल गांधी म्हणाले, 'मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही. मी सभागृहात असो की बाहेर याने मला काही फरक पडत नाही. मी आवाज उठवत राहीन.