Rahul Gandhi On Adani Row: उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात जानेवारी महिन्यात हिंडनबर्गने एक अहवाल सादर केला. तेव्हापासून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. आता परत एकदा राहुल यांनी पत्रकार परिषदेतून पीएम मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, अॅपल अलर्ट प्रकरणावरही भाष्य केले.
'मोदींचा आत्मा अदानीमध्ये'पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मा अदानीमध्ये आहे. आम्ही अदानी मुद्द्यावरुन सरकारला इतके कोंडीत पकडले की, सरकारने आता हेरगिरीचा वापर सुरू केला आहे. सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर, पीएम मोदी दुसऱ्या क्रमांकावर तर अमित शहा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशाची सत्ता अदानींच्या हातात आहे," अशी टीका राहुल यांनी केली.
राहुल गांधींचा सरकारवर हेरगिरीचा आरोपराहुल पुढे म्हणाले, "तुम्ही कितीही हेरगिरी केली तरी आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला फोन हवा असेल तर माझा फोन घ्या." यावेळी राहुल गांधींनी अनेक विरोधी नेत्यांना त्यांच्या फोनमध्ये आलेल्या इलर्ट ई-मेलची प्रतही दाखवली. "स्टेट स्पाँसर्ड हल्लेखोर फोनमध्ये हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आम्ही पोपटाला अशा प्रकारे पकडले आहे की, तो पळून जाऊ शकत नाही. संपूर्ण विरोधी पक्षाला अॅपलकडून अलर्ट मिळाला आहे. हे त्याच पोपटाचे काम आहे. आम्ही लोकांसाठी लढत आहोत, आम्हाला काही फरक पडत नाही," असंही राहुल म्हणाले.
'फक्त सरकार बदलून अदानी जाणार नाही'हे अदानी सरकार असेल, तर हे सरकार कसे बदलणार? त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. फक्त सरकार बदलून अदानी जाणार नाहीत. वेळ आल्यावर सांगेन. यासाठी औषध द्यावे लागेल. मी आयडिया ऑफ इंडियाला वाचवत आहे. हा एक मोठा लढा आहे. मी नेहमी सत्य बोलतो, आपण मक्तेदारीचे बळी बनत आहोत, मी मक्तेदारीच्या विरोधात आहे. अदानी आता ईडी/सीबीआयवरही नियंत्रण ठेवत आहे. यामुळे गुलामगिरी परत येईल. मागासलेले, दलित, आदिवासी यांना त्यांचे हक्क मिळू शकत नाहीत, हे मक्तेदारीचे आणखी एक उदाहरण आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.