नवी दिल्ली: काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांच्या या निर्णयाचं प्रियंका गांधींनी समर्थन केलं आहे. राहुल गांधींसारखं धाडस फार कमी लोक दाखवतात, असं प्रियंका यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. त्यामुळे राहुल यांच्याप्रमाणेच प्रियंका यांनीही पक्षातील इतर नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.काल राहुल गांधींनी ट्विटरवर त्यांचा 4 पानी राजीनामा शेअर केला. राजीनाम्यावर ठाम असल्याचं राहुल यांनी ट्विटमधून पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मात्र, अद्याप काँग्रेसनं नव्या अध्यक्षांची निवड केलेली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू आहे. काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. तसंच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही आपलं पद हटवलं. ट्विटर अकाऊंटवरील बायोटेडातून राहुल यांनी काँग्रेस प्रेसिडेंट हा उल्लेख काढून टाकला. त्यामुळे ट्विटरवरही केवळ काँग्रेस पक्षाचा सदस्य आणि लोकसभा सदस्य असंच पद लिहिलं आहे.