बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्जसेवन देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती प्रकरणातून ड्रग्जसेवन आणि बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा संसदेतही गाजला होता. त्यानंतर, आता आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर कर्नाटक भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी धक्कादायक विधान केलं आहे. नलीन कुमार कटील यांच्या विधानावरुन काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन असून ते तस्करीदेखील करतात, असा गंभीर आरोप भाजपा नेते नीलन कुमार कटील यांनी केला आहे. कटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. दरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे अगोदरच वाद निर्माण झाला आहे. त्यातच, आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे आणखी वाद वाढताना दिसत आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांनी मोदींबद्दल विधान केलेलं ट्विट हटविण्याच्या सूचना संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
शिवकुमार यांनी ट्विट करुन म्हटलं की, “राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे”. सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेलं असंसदीय ट्वीट खेदजनक असून काढण्यात येत आहे, असेही शिवकुमार यांनी सांगितले. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर त्यांनी याची आठवण करुन दिली.
काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष
“राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,” असं नलीन कुमार कटील यांनी म्हटलं आहे. राजकारणात राजकीय संसस्कृतपणा जपायला हवा, असं मी कालच म्हटलं होतं. माझ्या विधानाशी भाजपा नेते सहमत असतील तर राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याची ते माफी मागतील, असेही शिवकुमार यांनी म्हटलंय.