नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या या नेपाळ दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे. हा व्हिडीओ Lord Of the Drinks, Nepal मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपा प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी सांगितले की, राहुल गांधी काय करत आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र राजस्थानमधील जोधपूर येथे हिंसाचार सुरू आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. मात्र त्यांनी भारतीय लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थांबलं पाहिजे. काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. मात्र राहुल गांधींची पार्टी अशीच सुरू राहणार आहे. ते राजकारणाबाबत गंभीर नाही आहेत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत विचारले की, व्हेकेशन, पार्टी हॉलिडे, प्रेजर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट आदी आता देशासाठी नवीन राहिलेले नाही.
भाजपाचे सोशल मीडिया इन्चार्ज अमित मालवीय यांनी ट्विट केलं की, पक्ष संकटात असताना राहुल गांधी हे नाईट क्लबमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये सातत्य आहे.