काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काल लंडनमधील चॅटम हाऊसमध्ये अनेत मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. तसेच लंडनमधील हाऊस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला. भारतातील सत्ताधारी पक्ष हा द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीचं अनुकरण करतो.
थिंक टँक चॅटम हाऊसमध्ये आपले म्हणणे मांडताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे तयार झाला आहे. तसेच संघ ही एक कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना आहे. या संघटनेने भारताच्या जवळपास सर्वस संस्थांवर कब्जा केला आहे. संघामुळे भारतामध्ये डेमोक्रॅटिक कॉम्पिटिशनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. राहुल गांधी यांनी संघावर निशाणा साधताना सांगितलं की, प्रेस, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग सर्वच संस्था धोक्यात आहेत. तसेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने नियंत्रित झालेल्या आहेत.
तर राहुल गांधी यांनी हाऊसस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत मोठं विधान केलं. या भारत चीन संबंधांची तुलना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाशी करत ते म्हणाले की, माझ्या मते, भारत आणि चीनच्या सीमेवर जे काही चिनी सैनिक तैनात आहेत. त्याबाबत माझं मत तेच आहे जे सध्या युक्रेनमध्ये होत आहे. मी याबाबत एस. जयशंकर यांच्याशी बोललो, मात्र त्यांनी माझ्याशी असहमती व्यक्त केली. त्यांना वाटते ही बाब हास्यास्पद आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, रशियाला युक्रेनच्या युरोप आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांबाबत आक्षेप आहे, रशियाने सांगितले होते की, या संबंधांवर नियंत्रण आणलं नाही तर ते क्षेत्रिय अखंडतेसाठी आव्हान बनतील. आज भारताच्या सीमांवरही तेच होत आहे. कारण भारताचे अमेरिकेसोबत चांगले संबंध कायम राहावेत असे चीनला वाटत नाही. त्यामुळेच चीन भारताला सातत्याने धमकी देत आहे की, अमेरिकेशी संबंध कामय ठेवले तर आम्ही कारवाई करू. त्यामुळेच चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य तैनात केलं आहे.
केंब्रिज विद्यापीठामध्ये हल्लीच केलेल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं विधान केलं होतं. त्याबरोबरच त्यांनी आपली आणि इतर नेत्यांवर लक्ष ठेवलं जात असल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता.