नवी दिल्ली: ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या यशानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्यांना अशा निर्णायक क्षणी सोडून जात नाही. राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पक्षाध्यक्ष आहेत, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले.
ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. तर नागालँडमध्येही भाजपाने एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. आतापर्यंतचे कल पाहता नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तर मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी याठिकाणी भाजपाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. सध्या देशातील केवळ पाच घटक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस मेघालय कायम राखणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.