नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे विधान करत केंद्र सरकारवर टीका केली होती. यावरुन लोकसभेत शुक्रवारी सत्ताधारी भाजपाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. यावेळी राहुल गांधींना लोकसभेचे सदस्य होण्याचा किंवा खासदार म्हणून इथे बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया अभियान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 'आयात करणारा देश' ही भारताची ओळख बदलून निर्यातदार देश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनाही राबवल्या जाताहेत. त्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगार मिळू शकतील. परंतु, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी 'मेक इन इंडिया'वरून जो शब्दप्रयोग केला आहे, तो अस्वस्थ करणारा, जनभावना दुखावणारा आहे. असा शब्दच्छल करणारे लोकही या सभागृहात निवडून येऊ शकतात का? असा सवाल करत राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
याचबरोबर, आमच्या पक्षातील काही व्यक्तींनी अपशब्द वापरले होते, तेव्हा आम्ही त्यांना बोलावून खेद व्यक्त करायला, माफी मागायला सांगितली होती. मात्र, राहुल गांधी यांनी फक्त या सभागृहाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. एका पक्षाचे नेते 'रेप इन इंडिया' असे बोलतात. देशातील महिलांचा बलात्कार करायला या, असे विधान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केले असेल. हा महिलांचा अपमान सहन करणार नाही. गांधी कुटुंबातील व्यक्तीने असे विधान करुन देशातील महिलांचा अपमान केला. हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे, असे म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.