"नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, नाव नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:16 PM2023-08-17T12:16:29+5:302023-08-17T12:32:40+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहरू मेमोरियल म्युझियमच्या नामांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहरूंची ओळख ही त्यांचे कर्म आहे, त्यांचे नाव नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लडाख दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले. १५ जून २०२३ रोजी राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता, ज्याची औपचारिकता स्वातंत्र्य दिनाच्या (१४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला झाली.
राहुल गांधी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दुपारी एक वाजता ते लेहला पोहोचतील. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यात पहिल्यांदाच लेह आणि कारगिलला भेट देणार आहेत. यादरम्यान ते काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय कार्यक्रमांव्यतिरिक्त राहुल गांधी लडाखमध्ये बाईक ट्रिपही करणार आहेत.
नेहरू जी की पहचान उनके कर्म हैं, उनका नाम नहीं।
— Congress (@INCIndia) August 17, 2023
: नेहरू मेमोरियल का नाम बदले जाने पर @RahulGandhi जी pic.twitter.com/cjw8LL7mGO
दरम्यान, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज होणारी बिहार प्रदेश काँग्रेसची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. याचबरोबर, पुढील महिन्यात हिल कौन्सिलच्या निवडणुका होणार आहेत. त्या दौऱ्यात राहुल गांधी कारगिललाही भेट देणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारगिल हिल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे.
नामांतराचा निर्णय का घेतला गेला?
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्यानंतर अधिकृत निवासस्थान किशोर मूर्ती भवन होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर पुढे या संकुलाचे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीत रूपांतर करण्यात आले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कल्पना मांडली की तीन मूर्ती संकुलात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित एक संग्रहालय असावे, ज्याला नेहरू स्मारकाच्या कार्यकारी परिषदेने मान्यता दिली. २०२२ मध्ये, पंतप्रधानांना समर्पित हे संग्रहालय पूर्ण झाले. त्यानंतर ते एप्रिल २०२२ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले. जून महिन्यात झालेल्या बैठकीत नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नृपेंद्र मिश्रा,जे पीएम मोदींचे मुख्य सचिव होते, ते पीएम संग्रहालयाच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत.