नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रियांका गांधी पुन्हा राजकारणात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी(भाजपा) भयभीत झाली आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. मी खूप खुश आहे. कारण, प्रियांका माझ्यासोबत काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्यासाठी आम्हाला तरुण नेतृत्वाची गरज होती. प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही पत्नी प्रियांकाचे अभिनंदन केले आहे. या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर मी कायम तुझ्या सोबत असेन, अशी पोस्ट रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर दिली आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी आतापर्यंत सक्रीय राजकारणापासून दूर होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसमधले कोणतेही पद नव्हते. मात्र, आता राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फायरब्रँड नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात तेच भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक असतील. त्यांच्या आक्रमक प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.