- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्या पक्षाचे लोकसभेतील गटनेतेपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याअगोदर आपल्या पक्षांच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेत राहुल गांधी हा प्रस्ताव नाकारला.लोकसभेत काँग्रेसचे विद्यमान गटनेते असलेले चौधरी यांची पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची लोकसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात यावी, असे त्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुचविले होते. ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वानुसार चौधरी लवकरच गटनेतेपद सोडणार असल्याची चर्चा आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांकडे स्पष्ट केले की, ते कोणतेही पद स्वीकारणार नसून, लोकसभा सदस्य म्हणून यापुढेही कार्यरत राहतील. यासंदर्भात अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, काँग्रेस श्रेष्ठी देतील तो आदेश मी मान्य करीन. सोनिया गांधी यांनी सोपविलेली जबाबदारी मी आता पार पाडत आहे.काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, गुलाम नबी आझाद व इतर अनेक नेत्यांकडे वर्षानुवर्षे एकच जबाबदारी असल्यामुळे त्यात आता फेरबदल करण्यात आले आहेत. गुलाम नबी आझाद राज्यसभेत विरोधी पक्षनेते असून, ते काँग्रेसचे अनेक वर्षे सरचिटणीस होते.काँग्रेसची हुशार खेळीअधीररंजन चौधरी यांना पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणे ही हुशार खेळी आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना चौधरी यांनी नेहमीच जोरदार विरोध केला आहे.अधीररंजन चौधरी लोकसभेवर आतापर्यंत पाच वेळा निवडून आले आहेत. देशभरातील दोन लोकसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट दिसून आली होती. त्या वातावरणातही चौधरी लोकसभा निवडणूक जिंकले होते.पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस डाव्या पक्षांबरोबर युती करण्याची शक्यता अधीररंजनचौधरी यांनी काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नेमल्याने निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांचा लोकसभेतील काँग्रेसचे गटनेतेपद स्वीकारण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:44 AM