नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
बैठकीबाबत पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मात्र हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा दिला आणि समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नका असा सल्ला दिला. दोन दिवसांआधीच राहुल गांधी राजीनामा देणार होते मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना रोखलं. कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी राजीनामा देण्यासाठी आग्रही होते तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि महासचिव के सी वेणुगोपाळ यांनी त्यांना राजीनामा देऊ नका असा सल्ला दिला.
कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहचले तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही राहुल यांना राजीनामा देऊ नका असं सांगितले. तसेच तुम्ही अध्यक्ष नसाल तर कोण अध्यक्ष होणार? असा सवाल करत मनमोहन यांनी निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितले. त्यानंतरही राहुल गांधी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. त्यावर कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी मागील 5 वर्षात राहुल गांधी यांनीच नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे असं सांगितले.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर सखोल चर्चा केली जाईल. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यावर आगामी बैठकीत चर्चा होईल अशी माहिती काँग्रेस नेते ए. के अँन्टनी यांनी दिली.