अमेठी - आज देशामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र त्या अगोदर अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. संजय गांधी हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल रोजी उपचाराविना मृत पावलेल्या रुग्णाच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप स्मृती ईराणी यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये स्मृती ईराणी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज मी निशब्द आहे, एखादा माणूस खालच्या पातळीपर्यंत राजकारण करु शकतो हा विचार कधी केला नव्हता. या गरीब रुग्णाकडे मोदी सरकारचं आयुष्यमान भारत कार्ड होतं मात्र हॉस्पिटल राहुल गांधी यांचे असल्याने त्याच्यावर उपचार झाले नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अमेठीतील लोकांना याचं उत्तर दिलं पाहिजे की, या निर्दोष माणसाला का मारलं गेलं? असा सवाल स्मृती ईराणी यांनी विचारला आहे.
दरम्यान स्मृती ईराणी यांनी केलेला दावा संजय गांधी हॉस्पिटल प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे. 40 वर्षीय नन्हेलाल मिश्रा या रुग्णाला 25 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यांचे यकृत खराब झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र रुग्णाचे नातेवाईक अरुण कुमार मिश्रा यांनी दावा केला आहे की, रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करताना 3 हजार रुपये भरण्यात आले होते. आयुष्यमान कार्डमुळे रुग्णावर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. आम्ही आयुष्यमान कार्ड रुग्णालय कर्मचाऱ्याला दाखवले त्यावर त्यांनी सांगितले की आयुष्यमान कार्ड योगी आणि मोदी यांचे आहे. हे हॉस्पिटल काँग्रेसचे असल्याने येथे आयुष्यमान कार्ड चालत नाही. त्यानंतर 26 एप्रिलला या रुग्णाचा मृत्यू झाला. अरुण मिश्रा यांनी अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती ईराणी यांनी हे प्रकरण सांगितले.
पण स्मृती ईराणी यांनी केलेला दावा फेटाळून लावत रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना यकृताची समस्या होती. आमच्याकडून शक्य तेवढे उपचार रुग्णावर करण्यात आले, रुग्णालयात कधीच राजकारण केले जात नाही. रुग्णांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे असं रुग्णालयाचे एमडी कॅप्टन सूर्य महेंद्रसिंह चौधरी यांनी सांगितले.
तसेच नन्हेलाल मिश्रा यांचे घर हॉस्पिटलपासून 3 किमी अंतरावर आहे. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हते. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. 26 एप्रिलपासून आजपर्यंत त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली नाही मात्र आता भाजपाकडून त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असे रुग्णालयाचे प्रबंधक भोलानाथ त्रिपाठी यांनी सांगितले.