नवी दिल्ली - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे संकटात सापडलेल्या कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मुद्दा आज लोकसभेमध्ये उपस्थित झाला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी कर्नाटक सरकारवर आलेल्या संकटासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसमधील राजीनामा सत्राची सुरुवात राहुल गांधी यांनी केली असून, त्यानंतर इतर नेतेही राजीनामे देऊ लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपाच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच कर्नाटकमध्ये भाजपा लोकशाहीची हत्या करत आहे. आमचे सरकार पाडण्यासाठी पक्षांतराची मोहीम हाती घेतली गेली आहे. विरोधी पक्षांची सरकारे सत्तेत राहणे भाजपाल मान्य नाही. त्यासाठी आमच्या पक्षाच्या आमदारांना मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये ठेवले गेले आहे. दरम्यान, अधीररंजन चौधरी यांनी केलेल्या आरोपांना राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्त दिले. कर्नाटकमध्ये जे काही चालू आहे त्यामागे भाजपाचा हात नाही. कुणालाही आमिष दाखवून पक्षांतर करवून घेण्याचा आमचा इतिहास नाही. संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनाही टोला लगावला. ''राजीनामे देण्याची सुरुवात आम्ही केली नाही. तर काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. आता त्यांचे एकापाठोपाठ एक दिग्गज नेते राजीनामे देत आहेत. त्याच्याशी भाजपाचे काहीही देणेघेणे नाही,''असेही ते म्हणाले. दरम्यान, स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेलं कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता जेडीएसच्या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे लवकरच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. त्यामध्ये आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज आमदारांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकीदेखील उडत आहेत.
काँग्रेसमधील राजीनामासत्राला राहुल गांधीच जबाबदार, राजनाथ सिंह यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 3:55 PM