रायबरेली - लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाताना प्रचारावेळी राहुल गांधी एका सलूनमध्ये गेले होते. त्याठिकाणी राहुल यांनी दाढी आणि केस कटिंग केली होती. आता त्या सलून चालकाला राहुल गांधींनी रिटर्न गिफ्ट पाठवलं आहे. राहुल गांधींनी लालगंज येथील रहिवासी असलेल्या मिथूनला एक शॅम्पू चेअर, २ हेयर कटींग चेअर आणि एक इनवर्टर बॅटरी पाठवली आहे. हे गिफ्ट पाहून मिथुन खुश झाला आणि त्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचे आभार मानले आहेत.
याआधी राहुल गांधी यांनी सुल्तानपूर येथील मोची रामचेत यांना बूट शिवण्याची मशीन पाठवली आहे. ज्यामुळे त्यांनीही राहुल गांधींचे कौतुक केले आहे. राहुल गांधी माझ्या दुकानात आले आणि माझे नशीब पालटले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लालगंज परिसरात राहणाऱ्या सलून चालक मिथुनला खासदार राहुल गांधींकडून दुकानासाठी लागणारे साहित्य पाठवण्यात आले आहे. १३ मे रोजी राहुल गांधी यांची लालगंजच्या बैसवारा इंटर कॉलेज खेळ मैदानात एक जनसभा झाली होती. ज्याठिकाणी परतताना त्यांनी मिथुन यांच्या दुकानात दाढी आणि केस कटिंग केले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मिथुनच्या सलूनमध्ये केस कापल्यामुळे सर्वत्र चर्चा झाली होती. सोशल मीडियात ही बातमी व्हायरल झाली. राहुल गांधींचा दाढी आणि केस कापतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यात १२ मे रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून पाठवलेले एक शॅम्पू चेअर, २ हेअर कटिंग, १ इनवर्टर बॅटरी मिथुन यांच्याकडे सोपवण्यात आली. इतके मोठे नेते माझ्या दुकानात दाढी बनवण्यासाठी आले आणि केसही कापले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. राहुल गांधींनी मला पाठवलेले गिफ्ट आनंदाची गोष्ट आहे असं मिथुन यांनी सांगितले.
दरम्यान, सुल्तानपूरच्या रामचेत मोची यांनाही राहुल गांधींनी सरप्राईज गिफ्ट दिलं होते. २६ जुलैला राहुल यांचा ताफा त्यांच्या दुकानाबाहेर थांबला होता. राहुल यांनी रामचेत यांना केवळ गिफ्ट पाठवले नाही तर दुकानात चप्पलही आणि बूटही चिटकवण्याचं काम केले. रामचेत यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना शिलाई मशिन पाठवली त्याशिवाय सरकारी मदतीचं आश्वासन दिले.