- संजय शर्मा/आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी आडनावप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तीन दिवसांनी सोमवारी त्यांना त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर तब्बल १३७ दिवसांनी राहुल गांधी यांचे लोकसभेत पुनरागमन झाले. यावेळी त्यांचे ‘इंडिया’ गटाच्या सदस्यांनी स्वागत केले. संसदेत मंगळवारी मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार असून त्याची सुरुवात राहुल गांधी करण्याची शक्यता आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी दुपारी संसदेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या कामकाजात भाग घेतला. मात्र, मणिपूरच्या मुद्द्यावरून गदराेळ झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृह तहकूब झाले.
सरकारही सज्जअविश्वास ठरावावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडून पश्चिम बंगाल आणि राजस्थानच्या खासदारांना बाेलण्यास सांगितले जाईल. भाजपकडून लॉकेट चॅटर्जी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत यांना उतरविले जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही बोलू शकतात.
सरकारी घर परत मिळेल का? राहुल गांधी यांना तुघलक लेन भागातील घर परत मिळविण्यासाठी संसदीय गृहनिर्माण समितीकडे पुन्हा अर्ज करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. हा बंगला अद्याप कुणालाही दिला नाही.
ट्विटर प्रोफाइल बदलले...संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विटर प्रोफाइलचे वर्णन बदलून ‘संसद सदस्य’ असे केले. अपात्रतेनंतर त्यांनी ते ‘अपात्र संसद सदस्य’ असे केले होते.
तीन दिवस सत्ताधारी-विरोधकांत जुंपणारn अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, मनीष तिवारी, शशी थरूर यांना बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. n महागाई, बेरोजगारी, ईडी, चीनी आक्रमकता आणि सीबीआयचा गैरवापर, या मुद्द्यांसह मणिपूरमध्ये महिलांसोबत झालेली वागणूक आणि तिथे सुरू असलेला हिंसाचार हे विरोधकांचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र माेदी गुरुवारी देणार उत्तरदोन ते तीन दिवस चालणाऱ्या या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत. पंतप्रधानांचे अविश्वास प्रस्तावावरील भाषण हे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या आघाडीतील २६ पक्षांवर हल्लाबोल करणारे ठरेल.