Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 4 महिन्यांनंतर संसदेत परतले. 'मोदी आडनाव' प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली होती. यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्वही गेले होते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे राहुल गांधींना सदस्यत्वही बहाल करण्यात आले. यानंतर सोमवारी(दि.7) राहुल लोकसभेत (LokSabha) पोहोचले. यावेली काँग्रेसच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
राहुल गांधी सोमवारी दुपारी 12 वाजता लोकसभेत पोहोचले. गेट क्रमांक-1 येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी राहुल गांधींच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल यांचे संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेतील कार्यालयात मिठाई वाटली. संसदेत आल्यानंतर राहुल गांधी सभागृहात बसले, मात्र काही वेळातच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
मार्च महिन्यात राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आता चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळाले आहे. विशेष म्हणजे, या चार महिन्यांत राहुल गांधी संसदेत गेले नसले तरी सरकारविरोधातील त्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. राहुल विविधी ठिकाणाचे दौरे करत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने सरकारवर निशाणा साधत होते.
राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रातील मोदी सरकारवर अदानी प्रकरणावरुन टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. पण, आता त्यांना त्यांचे लोकसभा सदस्यत्व परत मिळाल्यामुळे पावसाळी अधिवेशनात त्यांची आक्रमक शैली पुन्हा पाहायला मिळू शकते.
सध्या अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधकांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना संसदेत बोलण्याची मागणी केली आहे. यातच विरोदकांनी अविश्वास प्रस्तावही ठरावही आणला आहे. 8 ऑगस्टपासून संसदेत यावर चर्चा सुरू होणार असून, त्यानंतर 10 ऑगस्टला पंतप्रधान मोदी उत्तर देणार आहेत. आता यावरुन राहुल गांधी काय बोलणार, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.