चंदीगड - लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे. मात्र आघाडीतील मित्रपक्षात कुठे ना कुठे कुरबुरी असल्याचं समोर येते. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधीही त्यांच्या टार्गेटवर होते. भगवंत मान यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर अनेक आरोप केले.
राहुल गांधींवर निशाणा साधत मुख्यमंत्री मान म्हणाले की, काँग्रेसमध्ये एक असा नेता आहे. त्यांना राहुल गांधी या नावाने ओळखले जाते. त्यांना पक्षात कोणतेही पद नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते तेव्हा राहुल गांधी छत्तीसगडच्या जंगलात फिरत होते. ही कसली यात्रा आहे माहीत नाही असा टोला त्यांनी लगावला.
सिद्धू यांनाही भगवंत मान यांचा चिमटा
पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू हेही भगवंत मान यांच्या निशाण्यावर होते. नवज्योत सिंग सिद्धू यांची तुलना 'ड्रायव्हरलेस ट्रेन'शी केली. ही ट्रेन नुकसान पोहोचवणारी ट्रेन आहे. हे त्यांच्या कृतींचा नकारात्मक प्रभाव दाखवून देते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी काँग्रेस आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला आणि सभात्याग केला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री संतापले. काँग्रेस फिएट कारचं जुनं मॉडेल आहे जे अपडेट केले जाऊ शकत नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना टाळे आणि चावी देऊन विरोधकांना सभागृहात बंद करून ठेवा जेणेकरून ते बाहेर जाणार नाहीत असंही बोलले. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ घालत सभागृहात चर्चेची मागणी करत राहिले. अध्यक्षांनी चर्चेला परवानगी दिली. मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सभागृहाबाहेर जाऊन देऊ नका असं सांगत सभागृहाला टाळे लावा अशी मागणी केली.