नवी दिल्ली : काँग्रेसची लढाई ‘द्वेषपूर्ण आसुरी शक्ती’च्या विरोधात आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले. ‘शक्ती’विरोधात लढाई या त्यांच्या मुंबईतील वक्तव्यानंतर उमटलेले पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शक्ती’ हा शब्द पकडून जोरदार हल्लाबोल केल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हे वक्तव्य केले आहे.‘हमारी असुरी शक्ती से लडाई हो रही हैं, नफरत भरी असुरी शक्ती से,’ असे पक्ष मुख्यालयातून बाहेर पडताना पत्रकारांनी गाठले असता राहुल म्हणाले. (वृत्तसंस्था)
...हा तर विपर्यास
पंतप्रधान मोदी यांनी ‘शक्ती’वरून कोंडी करणे सुरू केल्यानंतर लगेच राहुल यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. आपण कोणत्याही धार्मिक शक्तीविरोधात नव्हे, तर खोटेपणा, भ्रष्टाचार, अंदाधुंदी याविरोधात बोललो होतो. ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, मोदी हे आपल्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत.
दुसऱ्या स्पष्टीकरणावरही भाजपची टीका
- राहुल यांच्या ‘असुरी शक्ती’ स्पष्टीकरणावरही भाजपने टीकास्त्र सोडले आहे. शक्ती वक्तव्यावर देशभर टीकेला सामोरे जावे लागल्याने आता ते ‘असुरी शक्ती’ अशी सुधारणा करीत आहेत.
- दोन दिवसांपूर्वी राहुल म्हणाले की, हिंदू धर्मात एक शक्ती आहे आणि आम्ही त्याविरोधात लढा देत आहोत. आता देशात गदारोळ माजल्याने त्यांनी आपले वक्तव्य बदलले आहे, असे भाजप प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले.