नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दररोज भाजप आणि आम आदमी पक्षात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत आता काँग्रेसने प्रवेश केला आहे. भाजपकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख या निवडणुकीतही करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील पाकिस्तानवरून भाजपला टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देशभक्तीच्या गप्पा मारतात. पाकिस्तानचे नाव घेतात. मात्र तरविंदर सिंह मारवाह असे नेते आहे ज्यांनी पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लगावले होते. पाकिस्तानात त्यांना अटकही करण्यात आली होती. भाजपकडे एकतरी नेता आहे का, ज्याने पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावले, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.
देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही. वास्तविक पाहता हिंदू धर्मात सर्वांना घेऊन पुढे जाण्याची शिकवण आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्षाकडून लोकांच्या मनात तिरस्कार भरवण्यात येत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केली.