हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 06:05 AM2021-12-19T06:05:08+5:302021-12-19T06:06:00+5:30

महात्मा गांधींनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असे राहुल गांधी म्हणाले.

rahul gandhi said hindu on the path of truth and pro hindus can do anything for power | हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

googlenewsNext

अमेठी : देशातील महागाई आणि बेरोजगारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकांना असे आवाहन केले की, हिंदूंनी सत्याच्या मार्गावरुन चालावे, कारण हिंदुत्ववादी सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. 

अमेठीमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत ते एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. महंगाई हटाओ, भाजप भगाओ प्रतिज्ञा पदयात्रा काढण्यापूर्वी हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक समजावून सांगताना राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे हिंदू आहेत जे सत्याच्या मार्गावरुन चालतात. व्देष पसरवत नाहीत. दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत. जे व्देष पसरवितात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात. 

राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, हिंदूंचा मार्ग सत्याग्रह आणि हिंदुत्ववाद्यांचा मार्ग सत्ताग्रह आहे. एक सत्यासाठी लढतो आहे आणि सत्याच्या मार्गावरून चालतो आहे तो हिंदू. दुसरा खोटारडेपणाच्या मार्गावरुन चालत आहे, हिंसाचार पसरवत आहे, व्देष पसरवत आहे. त्यांचे नाव हिंदुत्ववादी आहे. हिंदुस्थानात आज हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात लढाई आहे. मी २००४मध्ये पहिली निवडणूक येथूनच लढवली होती. आपण मला खूप काही शिकवले आहे. मी तुमच्याकडून काम करण्याचे शिकलो आहे. आपण मला मार्ग दाखवला आहे. आज देशासमोर बेरोजगारी आणि महागाई हे दोन मोठे प्रश्न आहेत. मात्र, याचे उत्तर ना मुख्यमंत्री देतात ना पंतप्रधान. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी कधी गंगा स्नान करतात, कधी केदारनाथला जातात. आज लडाखमध्ये चीनचे सैन्य देशाच्या आत बसलेले आहे. चीनच्या सैन्याने हजार किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे. मात्र, पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत, काही करत नाहीत. पंतप्रधान म्हणतात, आमची जमीन कोणीही घेतली नाही. थोड्या वेळात संरक्षण मंत्रालय म्हणते की, चीनने आमची जमीन घेतली आहे. ही देशाची वस्तुस्थिती आहे.

मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे बनवले. आधी सांगितले की, हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. देशातील सर्व शेतकरी याविरुद्ध उभे राहिले. वर्षभराच्या आंदोलनानंतर पंतप्रधान म्हणाले की, मी माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. मी संसदेत विचारले की, सातशे शेतकरी शहीद झाले. आपण त्यांना भरपाई दिली का? मला उत्तर मिळाले की, एकही शेतकरी शहीद झाला नाही. राहुल गांधी यांनी दावा केला की, पंजाबमधील काँग्रेस सरकारने ४०० शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि विधीमंडळ नेत्या आराधना मिश्रा मोना यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

गांधीजींचे आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी 

महात्मा गांधी यांनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले आणि नंतर हिंदुत्ववादी गोडसे पाहा, त्यास कोणी महात्मा म्हणत नाही. कारण नेहमी सत्य बोलणाऱ्या व्यक्तीस त्याने मारले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असेही राहुल गांधी म्हणाले.
 

Web Title: rahul gandhi said hindu on the path of truth and pro hindus can do anything for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.