लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारने भारतातील तरुण, शेतकरी व गरिबांना अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकवले आहे. सत्ताधारी पक्षच चक्रव्यूह निर्माण करतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केला. काँग्रेस पक्ष आणि विरोधक हा चक्रव्यूह भेदतात, असेही ते म्हणाले.
राहुल म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’ आहे जो कमळाच्या फुलाच्या आकाराचा असतो. त्यात भीती आणि हिंसा आहे. राहुल यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशिवाय चार लोकांची नावे घेतली, ज्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. तेव्हा राहुल यांनी उर्वरित नावे सांकेतिक रुपात घेतली.
दोन-तीन टक्के लोकच हलवा वाटतात...
राहुल यांनी भाषणादरम्यान बजेट हलवा समारंभाचा फोटो दाखवला. ते म्हणाले, या फोटोमध्ये बजेटचा हलवा वितरित केला जात आहे. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. यात एकही अधिकारी मागासवर्गीय किंवा आदिवासी नाही. तेच दोन-तीन टक्के लोक हलवा वाटतात. मग उरलेल्या 99 टक्के लोकांना काय मिळणार?
अग्निपथ, अन्नदाता आणि एमएसपी
अग्निपथच्या चक्रव्यूहात लष्कराचे जवान अडकले आहेत. अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही दिला गेला नाही. तुमच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्यांनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे एमएसपीची कायदेशीर हमी द्या, पण ती दिली गेली नाही. एमएसपीची कायदेशीर हमी इतके मोठे काम नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असती तर शेतकरी चक्रव्यूहातून वाचला असता. ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने, मला सांगायचे आहे की आम्ही एमएसपीला कायदेशीर हमी देऊ, असे राहुल म्हणाले.